सर्वनाम व त्याचे प्रकार (Pronoun And Its Types) व्याकरण …

“Marathi grammar pronouns and its types”

सर्वनाम

‘नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.’ नामांची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय. सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ती ज्या नामासाठी वापरली जातात, त्यांचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो. सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो; म्हणून त्यांना सर्वनामे म्हणतात. सर्वनाम ही स्वतंत्र शब्दजाती नाही. नामाला प्रथमस्थान आहे तर सर्वनामाला दुय्यम स्थान आहे. सर्वनामाचा उपयोग नामाऐवजी होत असल्याने सर्वनामाचे लिंग, वचन त्या नामावरून ठरते. मी, आम्ही, तू या सर्वनामाची लिंगे मूळ नामानुसार ठरतात तर तो, ती, ते या सर्वनामांचा वापर एकवचनी अर्थाने केल्यास या संर्वनामांना स्वतःचे लिंग असते. आपण, स्वतः ही सर्वनामे सर्वपुरुषी आहेत. कारण ती प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्व पुरुषांसाठी वापरली जातात.

१) पुरुषवाचक २) दर्शक ३) संबंधी ४) प्रश्नार्थक ५) सामान्य/अनिश्चित ६) आत्मवाचक

सर्वनामाची वैशिष्ट्ये :

१) सर्वनाम ही विकारी शब्दजाती आहे.

२) सर्वनामांना लिंग, वचन, विभक्ती असे विकार होतात.

३) सर्वनामांना स्वतःचा अर्थ नाही.

४) सर्वनामांना प्रतिनामे असेसुद्धा म्हणतात.

५) सर्वनाम ही नामावर अवलंबून असणारी शब्दजाती आहे, ती स्वतंत्र नाही.

६) तो, ती, ते या तृतिय पुरुषी सर्वनामांच्या ऐवजी नामे येऊ शकतात; परंतु मी व तू यासारख्या प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामांऐवजी नामे वापरली जाऊ शकत नाहीत.

१) मी २) तू ३) तो/ती/त्या/ते ४) हा / ही / हे / ह्या

५) जो / जी / जे / ज्या ६) कोण ७) आपण ८) काय ९) स्वतः

१) पुरुषवाचक सर्वनाम :

व्याकरणात पुरुष ही संकल्पना व्यापक आहे. मानवजातीतील नर असा त्याचा अर्थ होत नाही, तर मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही घटकाचा यात समावेश होतो. प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत. फक्त तृतीय पुरुषी सर्वनामे मात्र बदलतात.

पुरुषवाचक सर्वनामांचे खालील तीन प्रकार पडतात :

येथे पुरुष या शब्दाचा अर्थ व्यक्ती म्हणजे स्त्री किंवा पुरुष असा नसून जे व्यक्त होते त्याला व्यक्ती असे म्हणतात.

अ) प्रथम पुरुषवाचक : बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो, ती प्रथम पुरुषवाचक असतात.

उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः

१) मी उद्या गावाला जाणार आहे.

२) आपण सहलीला जाऊ.

३) आम्ही तुला मदत करू.

४) स्वतः खात्री करून घेतो.

ब) द्वितीय पुरुषवाचक : समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात, ती द्वितीय पुरुष वाचक असतात.

उदा. तू, तुम्ही, आपण, स्वतः इ.

१) तू एवढा लाडू खाऊन टाक.

२) तुम्ही एवढे काम कराच.

३) आपण आलात, बरे वाटले. (तुम्ही)

४) आपण आत या. (तुम्ही)

५) स्वतः जाऊन आलात हे बरे झाले. (तुम्ही)

क) तृतीय पुरुषवाचक : ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे, त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषी सर्वनामे म्हणतात. अशी व्यक्ती शक्यतो समोर नसते.

उदा. तो, ती, ते, त्या.

१) तो म्हणे आजारी होता.

२) ती अतिशय सुंदर होती.

३) त्या चांगले गात.

टीप : आपण/स्वतःचा वापर स्वतःच्या नावाऐवजी केल्यास ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे होतात. समोरच्या व्यक्तीच्या नावाऐवजी केल्यास ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे होतात तर तिसऱ्या व्यक्तीसाठी केल्यास ती तृतीय पुरुषवाचक होतात. म्हणून ती सर्वपुरुषी आहेत.

१) आपण/स्वतः जाऊन येऊ. (प्रथम पुरुषवाचक)

२) आपण/स्वतः जाऊन या. (द्वितीय पुरुषवाचक)

३) गुरुजींनी मला बोलावले, स्वतः / आपण मात्र आलेच नाहीत. (तृतीय पुरुषवाचक)

महत्त्वाचे : आपण व स्वतः ही सर्वनामे एकवचनी व अनेकवचनी अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात.

१) गुरुजींनी मला बोलावले, आपण/स्वतः घरी गेले. (अनेकवचन)

२) राजुने मला खेळायला बोलावले, आपण / स्वतः मात्र घरी गेला. (एकवचन)

टीप : आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषी दोन्ही वचनात येते.

२) दर्शक सर्वनाम :

  • हा / ही / हे / ह्या / तो / ती / ते / त्या + विशेषण + नाम = दर्शक सर्वनाम
  • हा / ही / हे / ह्या / तो / ती / ते / त्या + नाम + विशेषण = दर्शक विशेषण
दर्शक सर्वनामदर्शक विशेषण
१) ती चलाख मुलगी आहे.१) ती मुलगी चलाख आहे.
२) तो मठ्ठ मुलगा आहे.२) तो मुलगा मठ्ठ आहे.
३) तो गोरा मुलगा आहे.३) तो मुलगा गोरा आहे.
४) हा रानटी हत्ती आहे.४) हा हत्ती रानटी आहे.
  • हा/ही/हे/ह्या/तो/ती/ते/त्या + नाम + विशेषण = दर्शक विशेषण
  • नाम+हा/ही/हे/ह्या/तो/ती/ते/त्या + विशेषण = दर्शक सर्वनाम
दर्शक सर्वनामदर्शक विशेषण
१) गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे.१) ही गंगा हिंदूंची पवित्र नदी आहे.
२) सचिन हा चांगला खेळाडू आहे.२) हा सचिन चांगला खेळाडू आहे.
  • हा / ही / हे / ह्या / तो / ती / ते / त्या + नाम (पूरक) + क्रियापद = दर्शक सर्वनाम
  • हा / ही / हे / ह्या / तो / ती / ते / त्या + नाम = दर्शक विशेषण
दर्शक सर्वनामदर्शक विशेषण
१) तो मुलगा आहे.१) तो मुलगा
२) तो कावळा आहे.२) तो कावळा
  • हा / ही / हे / ह्या / तो / ती / ते / त्या + नाम + षष्ठी + क्रियापद = दर्शक विशेषण
  • हा / ही / हे / ह्या / तो / ती / ते / त्या + षष्ठी + नाम + क्रियापद = दर्शक सर्वनाम
दर्शक सर्वनामदर्शक विशेषण
१) ही माझी पिशवी आहे.१) ही पिशवी माझी आहे.
२) हा आमचा कुत्रा आहे.२) हा कुत्रा आमचा आहे

महत्त्वाचे : काही प्रसंगी ‘हा/हे’ ही सर्वनामे कालवाचक क्रियाविशेषणाप्रमाणे वापरली जातात.

उदा. ‘तुम्ही पुढे व्हा’ हा (लगेच) मी आलोच.

३) संबंधी सर्वनामे :

एकाच वाक्यातील दोन उपवाक्यांना एकत्र जोडणारी व एकाच घटकासाठी वापरलेली सर्वनामे यात मोडतात. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना सुरुवातीला त्याचे नाव घेतो व त्यानंतर सर्वनामे वापरतो. त्याप्रमाणेच जोडीची सर्वनामे वापरताना गौण वाक्यातील जो, जी, जे, ज्या ही पुर्वी उल्लेख केलेल्या व्यक्तीशी संबंधीत सर्वनामे असतात, तर तो, ती, ते, त्या ही संबंधी सर्वनामानंतर येऊन संबंधी सर्वनामाशी संबंध प्रस्थापित करतात. म्हणून त्यांना दर्शक/अनुसंबंधी सर्वनामे म्हणतात.


१) जे चकाकते, ते सोने नसते.

२) जो करेल, तो भरेल.

३) ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल.

४) जे पेरावे, ते उगवते.

५) गर्जेल, तो करील काय? (बऱ्याचदा संबंधी सर्वनाम लिहिले जात नाही) – जो गर्जेल तो करील काय?

दर्शक व पुरुषवाचक सर्वनामातील फरक :

तो, ती, ते, त्या या सर्वनामांचा वापर प्रत्यक्ष वस्तूचा निर्देश करण्यासाठी केल्यास ती दर्शक सर्वनामे होतात, तर एखाद्या समोर नसणाऱ्या घटकाची माहिती सांगण्यासाठी केल्यास तृतिय पुरुषवाचक होतात.

१) तो बघा सूर्यास्त. (दर्शक सर्वनाम)

२) तो आज शाळेत आला नाही. (तृ.पुरुषवाचक सर्वनाम)

४) प्रश्नार्थक सर्वनामे :

एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात.

उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इ.

१) वाल्मिकीने रामायण लिहिले.

  • कोणी रामायण लिहिले?
  • वाल्मिकीने काय लिहिले?

वरील वाक्यात ‘वाल्मिकी व रामायण’ या नामाबद्दल कोण व काय हे शब्द वापरले आहेत. त्यामुळे ती सर्वनामे होतात; परंतु त्यांचा वापर नामांची पुनरावृत्ती टाळणे हा नसून प्रश्न विचारणे हा आहे; म्हणून त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात.

प्रश्नार्थक सर्वनामांचा इतर अर्थानी वापर :

i) कोण हे सर्वनाम प्रामुख्याने प्राण्यांसाठी व खासकरून मनुष्यासाठी वापरतात, तर काय हे सर्वनाम बहुधा सूक्ष्म किंवाक्षुल्लक प्राणी, निर्जीव किंवा अमूर्त वस्तूंसाठी वापरतात.

उदा. १) कोणी मारला हा उंदीर?

२) त्याने पत्रात काय लिहिले आहे?

ii) विलक्षणपणा किंवा आश्चर्य दाखविण्यासाठी.

उदा. १) काय मुलगा आहे हा !

२) कोण शहाणपणा हा !

iii) तुच्छता व तिरस्कार दाखविताना.

उदा. १) तू काय शहाणा लागून गेलास, माहिती आहे.

२) कोण काय करणार आहे माझे?

iv) दोन गोष्टींतील फरक दर्शविण्यासाठी.

उदा. १) ती कोण, तू कोण याचा विचार केलास का?

v) पृथकत्व, अगणितत्व व आश्चर्य दाखविण्यासाठी.

उदा. १) सभेला कोण कोण आले होते? (पृथकत्व)

२) कोणाकोणाची म्हणून नावे सांगू तुला आता? (अगणितत्व/आश्चर्य)

vi) काय सर्वनामाचा काही वेळेला अव्ययासारखा वापर होतो अशा वेळी त्यातून प्रश्न, आश्चर्य किंवा असंभवता असा अर्थ व्यक्त होतो.

उदा. १) तो गावाला गेला काय? (प्रश्न)

२) ती काय सुंदर आहे! (आश्चर्य)

३) तो काय करणार आहे आता. (असंभव)

कोण / काय या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर ती अनिश्चित सर्वनामे असतात.

१) कोणी यावे टिकलीं मारून जावे.

२) कोणी, कोणास काय म्हणावे !

३) कोण ही गर्दी !

४) माझ्या मुठीत काय ते सांग पाहू.

टीप : विधानार्थी व उद्‌गारवाचक वाक्यात वापरलेले कोण व काय हे शब्द अनिश्चित सर्वनामे किंवा सामान्य सर्वनामे असतात; परंतु वरील सर्वनामांचा वापर प्रश्नार्थक वाक्यात केल्यास ती प्रश्नार्थक सर्वनामे होतात.

  • महत्त्वाचे :

१) वैचित्र्य किंवा विविधता दाखविण्यासाठी सामान्य सर्वनामे वापरतात.

i) कोणी चांगला तर कोणी वाईट असतो. तुला सर्वच अनुभव येतील.

ii) कोणी प्रेमळ तर कोणी कपटी.

२) अनिश्चित सर्वनामाचा वापर संबंधी सर्वनामाप्रमाणेसुद्धा होतो.

i) तो काय (जे) वाटेल ते बोलतो.

६) आत्मवाचक सर्वनामे :

आत्मवाचक सर्वनामे वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाहीत, कारण ती स्वतः असा अर्थ व्यक्त करत असल्यामुळे ती नेहमी नामानंतरच वापरावी लागतात. तीन आत्मवाचक सर्वनामांपैकी निज हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे, तर स्वतः/आपण ही पुरुषवाचक व आत्मवाचक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात. फक्त आपण शब्दाची जात विचारल्यास पुरुषवाचक सांगावी तर स्वतः शब्दाची मात्र आत्मवाचक सांगावी.

  • कर्ता + आपण/स्वतः/निज (आत्मवाचक)

उदा. १) मी स्वतः त्याला पाहिले.

२) तो आपणहून माझ्याकडे आला.

३) तू स्वतः मोटार हाकशील का?

४) पक्षी निज बाळांसह बागडती.

  • आपण / स्वतः (कर्त्याच्या जागी साधे वाक्य असल्यास पुरुषवाचक)

उदा. १) आपण खेळायला जाऊ. (प्रथम पुरुषवाचक)

२) आपण मार्मिक बोललात. (द्वितीय पुरुषवाचक)

३) मधूने मला खेळायला बोलावले, ‘स्वतः मात्र आलाच नाही. (तृतीय पुरुषवाचक)

  • आपण / स्वतः (कर्त्याच्या जागी सर्वांना सर्वकाळी लागू पडणारे वाक्य – आत्मवाचक)

उदा. १) (माणूस) स्वतः आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

२) (माणसाने) स्वतः आपण टाकीचे घाव सोसल्याशिवाय, देवपण येत नाही.

  • सर्वनामोत्पन्न सर्वनामे :

मूळ सर्वनामांना प्रत्यय जोडून सर्वनामांची जी विविध रूपे तयार केली जातात त्यांना सर्वनामोत्पन्न सर्वनामे म्हणतात.

हा – असा, असला, इतका, एवढा

तो – तसा, तसला, तितका, तेवढा

जो – जसा, जसला, ज्याचा, ज्याला

  • महत्त्वाचे

मी व तू ही सर्वनामे आहे त्या रूपातच प्रथमा व तृतिया विभक्ती दर्शवितात.

१) मी काम करतो. (प्रथमा) – राम काम करतो.

२) मी काम केले. (तृतिया) – रामाने काम केले.

३) तू काम करतो. (प्रथमा) – राम काम करतो..

४) तू काम केले. (तृतिया) – रामाने काम केले.

  • सर्वनामांचा लिंगविचार :

मराठीत मूळ सर्वनामे नऊ असून त्यांपैकी फक्त तीनच सर्वनामे लिंगांनुसार बदलतात.

१) मी २) तू ३) तो, ती, ते ४) हा, ही, हे ५) जो, जी, जे

६) कोण ७) आपण ८) काय ९) स्वतः

  • सर्वनामाचा वचनविचार :

नऊ सर्वनामांपैकी फक्त पाच सर्वनामे वचनभेदानुसार बदलतात.

१) मी – आम्ही २) तु – तुम्ही ३) तो, ती, ते, त्या ४) हा, ही, हे, ह्या

५) जो, जी, जे, ज्या ६) कोण ७) काय ८) आपण ९) स्वतः

  • महत्त्वाचे : कोण, काय, आपण, स्वतः ही सर्वनामे लिंग व वचन अशा दोन्हीनुसार बदलत नाहीत.
  • सर्वनामांचा विभक्ती विचार : सर्वनामे नामांच्या ऐवजी येत असल्याने नामांना जे विभक्तीचे प्रत्यय लागतात, तेच सर्वनामांना लागतात. सर्वनामांना हाक मारता येत नाही, म्हणून त्यांची संबोधन विभक्ती होत नाही.

मराठी व्याकरण सर्वनाम

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र