आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
- इंग्रज-मराठे संघर्ष : १७७४ ते १८१८ दरम्यान मराठे-इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली.
- पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२) : वॉरन हेस्टिंग्जच्या काळात सुरू झालेले हे युद्ध मराठ्यांनी जिंकले.
- १७ मे १७८२ रोजी महादजी शिंदेंनी इस्ट इंडिया कंपनीशी सालबाईचा तह करून हे युद्ध संपविले.
३१ डिसेंबर १८०२ च्या वसईच्या तहामुळे मराठ्यांच्या साम्राज्यास (पेशवाईस) अखेरची घरघर लागली.
- दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५) हे युद्ध इंग्रजांनी जिंकले.
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (खडकीची लढाई): ५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकी येथे मराठ्यांचा पराभव.
तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मराठे पराभूत झाल्याने १८१८ मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाला व महाराष्ट्रात इंग्रजांची सत्ता स्थापित झाली.
इंग्रजी सत्तेविरोधात महाराष्ट्रातदेखील लहानमोठे उठाव होत राहिले. त्या उठावांची माहिती येथे घेणे अपरिहार्य ठरते.
१८५७ चा राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्र
१८५७ च्या उठावापूर्वी महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार व रामोशी यांच्यात झाला होता.
- महाराष्ट्रातील संस्थानिकांनी रामोशी, कोळी, भिल्ल यांना उठाव करण्यास प्रोत्साहन दिले होते.
महाराष्ट्रातील रामोशी बांधवांचे उठाव :
- प्रामुख्याने महाराष्ट्रात राहणारे रामोशी (रामवंशी) बांधव ‘नाईक’ अशी संज्ञा लावत.
- रामोशी या शब्दाचा अर्थ ‘रानवंशी’ म्हणजे रानात राहणारे असाही घेतला, जातो.
- रामोशी बांधव पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त, तसेच काही गावांचा महसूल गोळी करीत असत. त्यांना वतनी इनामेही देण्यात आली होती. ब्रिटिशांनी रामोशांची इनामे जप्त करतानाच कामावरूनही कमी केले.त्यामुळे त्यांनी उठाव केले.
- उमाजी नाईक यांनी रामोशांच्या बंडाचे नेतृत्व केले.
महाराष्ट्रातील १८५७ चा उठाव :
- १८५७ च्या उठावाचे लोण प्रामुख्याने उत्तर भारतातच सर्वाधिक पसरले. दक्षिण भारत उठावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला. महाराष्ट्रातील ज्या काही ठिकाणी १८५७ च्या उठावाचे पडसाद उमटले त्याचा थोडक्यात आढावा-
कोल्हापुरातील उठाव : ३१ जुलै १८५७ रोजी सैन्याच्या २७ व्या रेजिमेन्टमधील भारतीय सैनिकांनी उठाव करताना रेजिमेंटची तिजोरी लुटली. २१ व्या व २८ व्या तुकडीतील सैनिकांनी त्यांना मदत केली.
- ‘जेकब’ या ब्रिटिश अधिकाऱ्याने हा उठाव मोडून काढला.
- ६ डिसेंबर १८५७ रोजी कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील भारतीय सैनिकांनी उठावाचा प्रयत्न केला. मात्र तो वेळीच दडपून टाकण्यात आला. १५ डिसेंबर १८५७ रोजी कोल्हापूरात चिमासाहेब यांनी बंडाचा प्रयत्न केला.
- साताऱ्यातील उठाव : पेशवाईच्या अस्तानंतर देखील छत्रपती प्रतापसिंह सातारच्या गादीवर होते. इंग्रजांनी त्यांच्याशी तह करून ग्रँट डफ या अधिकाऱ्यास छत्रपतींच्या मदतीसाठी ठेवले.
- कालांतराने छत्रपती प्रतापसिंह यांना काशी येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेथे १८४७ साली त्यांचे निधन झाले.
- छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडमध्ये जाऊन छत्रपतींवरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली. ती अयशस्वी ठरल्याने छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रतापसिंह व रंगो बापूजी यांनी १८५७ च्य उठावात भाग घेतला, रंगो बापूजी यांनी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, बाठार, कराड, कळंबी, बेळगाव, आरळे, देऊरे इत्यादी ठिकाणे उठावासाठी निश्चित केली.
- भोरपासून बेळगावपर्यंत रामोशी, कोळी, मांग या समाजातील लोकांना एकत्रित केले.
- ब्रिटिशांनी हा उठाव तात्काळ मोडीत काढला. भोर येथील पंतसचिवांचे नोकर कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी रंगो बापूंना फितुरीने ब्रिटिशांच्या हवाली केले. ब्रिटिशांनी कृष्णाजींना ‘विश्वासराव’ हा किताब दिला.
- १८४८ साली डलहौसीने दत्तक वारसा हक्क नामंजूर करून सातारा राज्य खालसा केले
- नाशिकच्या पेठमधील उठाव : नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील राजा भगवंतराब निळकंठराव यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांनी उठाव केला. ६ डिसेंबर १८५७ रोजी हसूलच्या बाजारात भिल्लांच्या मदतीने उठाव झाला.
- ‘ग्लासपुल’ या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे बंड मोडून काढताना पेठच्या राजास फाशी दिली. •
- जानेवारी १८५७ मध्ये नांदगाव येथे भिल्लांनी केलेला उठावाचा प्रयत्न मोडून काढला गेला.
- अहमदनगरमधील उठाव: संगमनेरजवळ भागोजी नाईक यांनी उठाव केला.
- खानदेशात कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल समाजाने उठाव केला. यामध्ये ४०० भिल्ल स्त्रिया सहभागी
- सातपुड्यात शंकरशहांनी उठावाचे नेतृत्व केले.
- नागपूरमधील उठाव : नागपूरच्या उठाववाल्यांना लखनौ, कानपूर येथील बंडखोरांची साथ होती.
- १३ जून १८५७ रोजी सीताबर्डी, कामठी याठिकाणी उठावाचा आखलेला बेत इंग्रजांनी आधीच मोडून काढला. यावेळी नागपूरची राणी बांकाबाई इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली.
- औरंगाबादमधील उठाव : येथील घोडदळातील मुस्लीम समाजातील शिपायांच्या उठावाचा प्रयत्न ब्रिटिशांनी मोडून काढला, जमखिंडी संस्थानचे राजे आप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजांच्या मर्जीतील असल्यामुळे तेथील उठाव फसला.
- मुधोळमधील हुलगडी येथील बेरड समाजाने केलेला उठावाचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
- महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे उठाव : लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत लागू केल्यामुळे जमीन महसूलाची जबाबदारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे गेली. शेतसारा भरण्यासाठी अनेकांना जमिनी विकाव्या लागल्या. परिणामी, पुणे, सातारा, सोलापूर भागात शेतकरी बांधवांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले.
- १८७४ साली पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ‘कर्धे’ या गावाच्या शेतकऱ्यांनी सारा भरण्याचे नाकारले.
- १२ मे १८७५ रोजी ‘सुपे’ येथे शेतकऱ्यांनी पहिला मोठा उठाव करून मारवाडी, गुजर, सावकार यांच्यावर हल्ले केले. अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सावकारांची मालमत्ता लुटली.
- पुणे, सातारा, रायगड, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यात हे लोण पसरले.
- इंदापूर, भिमडी, कर्जत, शिरूर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा ही शेतकरी उठावाची केंद्रे होती.
- शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी सरकारने चार सदस्यांचे ‘डेक्कन रॉयटस् कमिशन’ नेमले.
- या कमिशनच्या शिफारशींनुसार १८७९ मध्ये सरकारने ‘दि डेक्कन अॅग्रिकल्चरल रिलिफ अॅक्ट’ संमत केला. या कायद्यातील तरतुदी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ‘तगाई कर्जे’ पुरविण्यात यावीत.
- शेतकरी बँका सुरू करण्यात याव्यात. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे हस्तांतरीत होऊ देऊ नयेत. या तरतुदींमुळे शेतकऱ्यांमधील असंतोष कमी होण्यास मदत झाली.
- विष्णूपंत गोडसे भटजी यांचा ‘माझा प्रवास: सन १८५७ च्या बंडाची हकीकत’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय :
महाराष्ट्रातील राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे –
१) ऐतिहासिक वारसा : छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले शिवजयंती व गणेशोत्सव इत्यादी बार्बीमुळे राष्ट्रवादास उत्तेजन मिळाले.
२) ब्रिटिशांनी केलेले आर्थिक शोषण.
३) पाश्चात्य संस्कृती व पाश्चात्य भाषेचा प्रभाव : ब्रिटिशांनी भारतात इंग्रजी शिक्षण सुरू केल्यामुळे भारतातील विविध प्रांतातील लोक एकमेकांच्या संपर्कात आले.
४) दळणवळणातील क्रांती: रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे इत्यादी सुविधांमुळे देशातील विविध प्रांतातील लोक एकमेकांच्या संपर्कात आले.
५) मध्यमवर्गाचा उदय इंग्रजी शिक्षणामुळे डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, साहित्यिक यासारखा सुशिक्षित मध्यमवर्ग पुढे येऊन त्यांनी राष्ट्रवादाच्या भावनेस व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.
६) प्रसारमाध्यमांमुळे लोकजागृती प्रबोधन काळात विविध वृत्तपत्रे व साहित्य यामुळे लोकांमध्ये जागृती होऊन राष्ट्रवादी भावना वाढीस लागली.
७) १८५७ चा उठाव : १८५७ चा उठाव जरी अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांच्या ‘फोडा व झोड़ा’ या नीतिमुळे संपूर्ण भारतात राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली.