नामाच्या वचन विचार :
‘नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो, त्याला वचन असे म्हणतात.’
वचनाचे एकवचन व अनेकवचन असे दोन प्रकार पडतात.
अनेकवचनालाच बहुवचन असे म्हणतात.
वचनासंबंधी काही महत्त्वाचे नियम :
१. नामांच्या तीन प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचे अनेकवचन होते.
२. पदार्थवाचक, भाववाचक तसेच विशेषनामाचे शक्यतो अनेकवचन होत नाही.
३. ज्यावेळी विशेषनामाचे अनेकवचन केले जाते त्यावेळी ते विशेषनाम सामान्य नामाची भूमिका करते.
४. आपण, कोण, काय या सर्वनामांचा वापर एकवचनी व अनेकवचनी अशा दोन्ही प्रकारे होऊ शकतो.
५. नामाच्या वचनाचा क्रियापदावरही परिणाम होतो.
६. आकारान्त विशेषणावर नामाच्या वचनाचा परिणाम होतो.
वचनामुळे नामाच्या रूपात खालीलप्रमाणे बदल होतो.
१) ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते.
कुत्रा – कुत्रे | ससा – ससे | आंबा – आंबे | घोडा – घोडे |
रस्ता – रस्ते | वाडा – वाडे | ओढा – ओढे | अनारसा – अनारसे |
राजा – राजे | टाका – टाके | तवा – तवे | आत्मा – आत्मे |
बोका – बोके | दांडा – दांडे | झरा – झरे | मासा – मासे |
2) ‘आ’ कारान्ताशिवाय इतर पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात.
देव – देव | लाडू – लाडू | खडू – खडू |
कवी – कवी | उंदीर – उंदीर | शत्रू – शत्रू |
फोनो – फोनो | गहू – गहू | तेली – तेली |
3) काही ‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन ‘आ’ कारान्त होते, तर काहींचे ‘ई’ कारान्त होते.
वीट – विटा | चूक – चुका | वेळ – वेळा |
खारीक – खारका | माळ – माळा | नक्कल – नकला |
तार – तारा | म्हैस – म्हशी | खाट – खाटा |
4) ‘य’ नंतर ‘ई’ आल्यास उच्चारात ‘य’ चा लोप होतो.
गाय – ( गायी ) – गाई |
सोय – ( सोयी ) – सोई |
5) खालील आ, ई, ऊ कारान्त स्त्रीलिंगी नामे दोन्ही वचनात सारखीच असतात.
भाषा – भाषा | माता – माता |
दिशा – दिशा | सभा – सभा |
आज्ञा – आज्ञा | विद्या – विद्या |
6) ‘ओ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘आ’ कारान्त होते.
बायको – बायका |
7) खालील ‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘या’ कारान्त होते.
नदी – नद्या | पणती – पणत्या |
काठी – काठ्या | टाचणी – टाचण्या |
8) ‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन ‘वा’ कारान्त होते.
सासू – सासवा | जाऊ – जावा |
पिसू – पिसवा | जळू – जळवा |
9) ‘अ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन ‘ए’ कारान्त होते.
घर – घरे | घड्याळ – घड्याळे |
फुल – फुले | दार – दारे |
10) ‘ई’ कारान्त व ‘उ’ कारान्त नामांची अनेकवचने होतांना बऱ्याचदा ‘य , व’ हे आदेश होऊन अनेकवचन तयार होते.
मोती – मोते / मोत्ये | मिरी – मिरे / मिऱ्ये |
11) ‘ऊ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते.
लिंबू – लिंबे | तट्टू – तट्टे |
वासरू – वासरे | पिलू – पिले |
12) ‘ए’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ई’ कारान्त होते.
केळे – केळी | गाणे – गाणी |
रताळे – रताळी | तळे – तळी |
लाटणे – लाटणी | मडके – मडकी |
13) पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेकवचन होत नाही.
सोने – सोने | दही – दही |
पाणी – पाणी | अस्थी – अस्थी |
14) खालील नामांचे अनेकवचनात रूप बदलत नाही.
दासी – दासी | युवती – युवती |
वळू – वळू | वस्तू – वस्तू |
बाजू – बाजू | लाली – लाली |
वचनासंबंधी विशेष माहिती :-
१) विशेषनामाचे अनेकवचन वापरल्यास ती सामान्य नामे होतात.
उदा. आमच्या शेजारी तीन पाटील आहेत.
२) आदरार्थी अनेकवचन : मोठ्या किंवा जवळच्या व्यक्तीबद्दल व्यक्ती एक असूनसुद्धा आदर व्यक्त करण्यासाठी अनेकवचनी शब्दप्रयोग केला जातो, याला आदरार्थी अनेकवचन म्हणतात.
उदा. १) पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील.
२) गुरुजी आताच शाळेत आले.
३) विपुलतादर्शक एकवचन : विपुलता दर्शविण्यासाठी काही नामांचे एकवचन वापरतात.
उदा. १) यंदा जरा जास्तच पपई आली.
२) जत्रेत लाख माणूस जमलं.
३) यावर्षी बराच आंबा पिकला.
४) खालील नामे नेहमी अनेकवचनीच आढळतात.
डोहाळे, कांजिण्या, शहारे, रोमांच, चिपळ्या, आट्यापाट्या, क्लेश, हाल इ.
५) सामान्यपणे खालील समूहदर्शक शब्द एकवचनी अर्थान वापरतात.
जोडपे, पंचक, त्रिकूट, आठवडा, ढीग, रास, मंडळ इ.