१) शृंगार रस :
स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, आकर्षणातून या रसाची निर्मिती होते.
उदा.
१) असे तुझ्याशी बोलावे हे ठरवुन आलो मनात कांही; आणिक तुझिया नेत्री दिसले बोलायाचे तसे तुलाही.
२) तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल.
३) डोळे हे जुलमी गडे रोखुनि मज पाहु नका.
४) सहज सख्या एकदाच येई सांजवेळी.
५) या कातर वेळी पाहिजेस तू जवळी
६) “दिवा जळे मम व्यथा घेउनी सशिल जागी तूही शयनी पराग मिटल्या अनुरागाचे असा शांत वेचुनी गुंफुनी”
२) वीररस :
पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून वीररस निर्माण होतो.
उदा.
१) साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते रक्त अपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते !
२) गर्जा जयजयकार, क्रांतिचा, गर्जा जयजयकार,
३) उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला.
४) जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू,
३) करुणरस :
शोक किंवा दुःख, वियोग, संकट यांतून हा रस निर्माण होतो आणि हृदयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनातून करुणरस निर्माण झालेला दिसतो.
उदा.
१) “मला ते दगड-धोंड्यांतून चालवीत नेत होते; पण माझ्यात कण्हण्याचीही ताकद नव्हती.”
२) हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला.
३) आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी.
४) पोर खाटेवर मृत्युच्याच दारा, कुणा गरिबाचा तळमळे बिचारा.
५) “लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता कवटाळुनि त्याला माता । ति आक्रोशें, रडते केविलवाणी भेटेन नऊ महिन्यांनी”
४) हास्यरस :
विसंगती, असंबद्ध भाषण, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णनातून हास्यरस निर्माण होतो.
उदा.
१) परीक्षेच्या वेळी बाक मोडका असू शकतो, म्हणून घरच्या खुर्चीचा पाय थोडा कापून अशा डगडगत्या खुर्चीवर तिला बसवून आम्ही आठवडाभर पेपर सोडवायला लावला.
२) परटा, येशिल कधि परतून ?
३) उपास मज लागला, सखेबाई, उपास मज लागला.
४) आम्ही कोण म्हणूनी काय पुसता, दाताड वेंगाडुनी फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला?
५) रौद्ररस :
अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून रौद्ररस निर्माण होतो.
उदा.
१) ‘सह्यगिरीतील वनराजांनो या कुहरांतुनि आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे
२) पाड सिंहासने दुष्ट ती पालथी ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती मुकुट रंकासि दे, करटी भूपाप्रति
झाड खट्खट् तुझे खड्ग रुद्रा.
६) भयानक रस :
भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. युद्ध, मृत्यू, अपघात, आपत्ती, स्मशाण इत्यादींच्या वर्णनांतून भयरस आढळतो.
उदा.
१) त्या ओसाड माळावर, दाट सावलीच्या पिंपरणीखाली तो अगदी एकटा होता आणि रात्र अमावस्येची होती.
२) “ओक्यांत भालु ओरडती वाऱ्यात भुते बडबडत्ती डोहात सावल्या पडती”
७) बीभत्स रस :
किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते, तेथे बीभत्स रस निर्माण होतो.
उदा.
१) शी! शी! तोंड अती अमंगळ, असे आधीच हे शेंबडे, आणि काजळ ओघळे वरूनि हे, त्यातुनिही हे रहे !
२) ही बोटे चघळीत काय बसले हे राम रेलाळ ही।
८) अद्भुत रस :
विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायीभाव असून परीकथा, अरेबियन नाइट्स, राक्षसांच्या गोष्टी यांमध्ये अद्भुतरस आढळतो.
उदा.
१) यापरी नगरांतले मग सर्व उंदिर घेउनी ठाकतां क्षणि गारुडी नदिच्या तिरावर येउनी; घेति शीघ्र उड्या पटापट त्या नदीमधि उंदिर, लोपला निमिषांत संचय तो जळांत भयंकर.
२) “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल”
९) शांत रस :
परमेश्वरविषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, पवित्र वातारणाचे वर्णन यांत शांत रस आढळतो.
उदा.
१) आनंद न माय गगनी! वैष्णव नाचती रींगणी !
२) “जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले
दैवाने नाही पडले तोवरती तू झोप घेत जा बाळा काळजी पुढे देवाला”